For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for काळाराम मंदिर सत्याग्रह.

काळाराम मंदिर सत्याग्रह

काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २ मार्च इ.स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील[] अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता.[]

काळाराम मंदिर सत्याग्रहामधील बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड व इतर सत्याग्रही, १९३०

आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा २ मार्च १९३०ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. त्यावेळी सत्ताधारी इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात काँग्रेस लढत होती तर हिंदू धर्ममार्तंडशाहीविरोधात आंबेडकरांचा संघर्ष सुरू होता. नाशिकामधील काळाराम मंदिरात हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉ. आंबेडकर यांनी केला होता. त्याबद्दल आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर लिहितात, "महाराष्ट्रातील स्पृश्य हिंदूंचे नाक जे नाशिक तेच दाबण्याचा निर्धार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला. डॉ. आंबेडकरांचा लढा माणुसकीस कलंक लावणाऱ्या अमानुष, अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता."[][]

काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आंबेडकरांनी स्पृश्य व सवर्णांना केलेले एक आवाहन होते.

"आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे."

— डॉ. बाबासाहेब आंबेडकर, २ मार्च १९३० रोजी केलेले भाषण[]
काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये सामील सत्याग्रही व पोलीस शिपाई

इ.स. १९२९च्या ऑक्टोबर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी विचारविनिमय करून नाशिक जिल्ह्यातील अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांनी प्रवेश करावा व गरज वाटल्यास सत्याग्रह करावा, असे निश्चित करण्यात आले. अस्पृश्य पुढाऱ्यांनी नाशिक येथे सत्याग्रह समिती स्थापन केली आणि नाशिकचे नेते भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांना त्या सत्याग्रह समितीचे चिटणीस तर अध्यक्ष केशव नारायण वर्धेकर यांना केले तर शंकरराव गायकवाड हे सभासद होते. या समितीने काळाराम मंदिराच्या पंचाना अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्याबाबत नोटीस पाठवली मात्र तिची पंचांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ३ मार्च १९३० रोजी प्रत्यक्ष सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले.[] २ मार्च १९३० रोजी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये एक परिषद भरली. २ मार्च १९३० रोजी सकाळी व दुपारी अशा दोन सभा बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, तसेच ३ मार्च १९३० रोजीही सकाळी आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आंबेडकरांनी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करावा व यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा उपदेश केला.[]

सत्याग्रह

[संपादन]

त्या परिषदेत ठरल्याप्रमाणे २ मार्च रोजी नाशिक शहरात अस्पृश्यांची मोठी मिरवणूक निघाली. ही मिरवणूक अंदाजे एक मैल लांबीची होती व त्यात सुमारे पंधरा हजार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.[ संदर्भ हवा ] मिरवणूक मंदिराजवळ पोहोचली. काळाराम मंदिराला पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही बाजूंनी दरवाजे होते, व मंदिराचे ते सर्व दरवाजे बंद होते म्हणून मिरवणूक गोदावरीच्या घाटाजवळ गेली. तिथे एक मोठी सभा झाली. दुसऱ्या दिवशी ३ मार्च रोजी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय सभेत झाला. सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत १२५ पुरुष आणि २५ स्त्रीया जातील, असे ठरले. सत्याग्रही चार गटांत विभागून दरवाजांवर धरणे धरून बसले होते. पतितपावनदास (उत्तर दरवाजा), कचरू साळवे (पूर्व दरवाजा), पांडुरंग राजभोज (दक्षिण दरवाजा) व शंकरदास नारायणदास (पश्चिम दरवाजा) असे चार नेते मंदिराच्या चारी दिशांवर आपल्या सहकाऱ्यांसह तयार होते. आंबेडकर आणि भाऊराव गायकवाड हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणची व्यवस्था पहात होते. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते. दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार आणि रामाचे दर्शन घेणार, असे ठरले.[] मंदिराभोवती हजारांच्यावर बंदुकधारी सैनिक तैनात करण्यात आले होते. त्या दिवशी स्पृश्यांनाही मंदिर प्रवेशास मज्जाव करण्यात आला होता. पुढे महिनाभर हा सत्याग्रह सुरूच होता. ९ एप्रिल, १९३० रोजी रामनवमीचा दिवस होता. त्याआधी सनातनी हिंदू आणि सत्याग्रहाचे नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि असे ठरले की स्पृश्य-अस्पृश्यांनी मिळून रामाचा रथ ओढावा. कार्यकर्त्यांसह आंबेडकर मंदिराजवळ आले. पण आंबेडकरांच्या अनुयायांनी रथाला हात लावण्यापूर्वीच सनातनी हिंदूंनी सत्याग्रहींना हुलकावणी देऊन तो रथ दुसरीकडे पळवला. त्या रथाचा पाठलाग आंबेडकरांच्या अनुयायांनी केला व चरण पादुकाजवळ थांबलेल्या सत्याग्रहींच्या लक्षात येताच त्यांनी सर्व शक्ती एकवटून रथ अडविला तेव्हा मारामारी व आंबेडकरांच्या अनुयायांवर दगडांचा वर्षाव झाला. तोवर आंबेडकर प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहचले. दगडांचा वर्षाव चालू होता. इतक्यात पोलिसांचा कडा फोडून भास्कर कद्रे नावाचा सत्याग्रही मंदिरात घुसला आणि रक्ताने माखून बेशुद्ध पडला.[] डॉ. आंबेडकरांवर दगडे पडू नये म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर छत्री धरली होती. उपस्थित सर्व सत्याग्रह्यांना व स्वतः आंबेडकरांनाही लहान-सहान इजा झाल्या होत्या. या घटनेत एक तरुण रक्तबंबाळ झाला होता नंतर त्याचा मृत्यू झाला.[ संदर्भ हवा ] आंबेडकरांनी बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर फ्रेडरिक साइक्स यांना पत्र लिहून हा सर्व वृत्तांत कळवला होता. "सत्याग्रहानंतर नाशिकमधल्या अस्पृश्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या. रस्ते बंद झाले, तसेच त्यांना दुकानातून वस्तू देखील मिळेनाशा झाल्या. सनातनी हिंदू त्यांच्यावर दमदाटी करू लागले. तुम्ही माजले आहात अशा शब्दांत अस्पृश्यांना बोलणी खावी लागत होती. ही दुःखं भोगूनही आंबेडकरांनी सत्याग्रह सुरूच ठेवला असे धनंजय कीर लिहितात.[ संदर्भ हवा ] या दरम्यान आंबेडकर गोलमेज परिषदेसाठी लंडनला गेले. त्यांच्या अनुपस्थितीत भाऊराव गायकवाड यांनी हा सत्याग्रह सुरूच ठेवला. पाच वर्षं हा लढा चालूनही अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळाला नाही. एका सत्याग्रही तरुणाने रामकुंडात उडी घेतली होती. सर्व सत्याग्रह, सभा, आंदोलने अहिंसेच्याच मार्गाने व्हावीत, असा आंबेडकरांचा आग्रह होता. कुठलाही कायदा मोडायचा नाही, असे ते म्हणायचे.[ संदर्भ हवा ] मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंबेडकरांनी गव्हर्नरकडे पाठपुरावा केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. आंबेडकरांनी ३ मार्च, १९३४ रोजी गायकवाडांना पत्र पाठवले आणि आता सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क व शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी, म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा, असे कळवले. त्यानंतर हा मंदिराचा सत्याग्रह बंद करण्यात आला, व तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही.[] काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे.[१०][११] मग शेवटी त्यांनी काळाराम मंदिराचे आंदोलन स्थगित केले. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच सर्व मंदिरे खुली झाली आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळाला.[][]

जर तुमची रामावर खरी भक्ती असेल तर तुम्हाला देवळातच प्रवेश का हवा अशा प्रश्नाचे उत्तर आंबेडकरांनी अमरावतीत घेतलेल्या सभेत दिले आहे. त्यात आंबेडकर म्हणतात, "उपासनेचे अनेक प्रकार आहेत. साकाराचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही. त्यांना सिद्ध करायचे आहे की त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही. किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही." पुढे आंबेडकर म्हणतात, "हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे. तितकीच अस्पृश्यांची आहे. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वसिष्ठांसारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या, तुकारामासारख्या वैश्यांनी केली तितकीच वाल्मिकी, रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे. या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे. मंदिरे जितकी स्पृश्यांचीच तितकीच अस्पृश्यांचीच आहेत."[][]

शोषितांचा लढा फक्त मंदिर प्रवेशापुरताच मर्यादित नाही, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले होते. इ.स. १९३३ मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांची येरवडा तुरुंगात भेट झाली होती त्यावेळी गांधींनी डॉ. सुब्बारायान यांच्या विधेयकाला समर्थन देण्याची विनंती आंबेडकरांना केली होती. आंबेडकरांनी नकार दिला. या विधेयकात मंदिर प्रवेशाबाबत लिहिलं आहे, पण अस्पृश्यांच्या पूजेच्या अधिकाराबाबत काहीच लिहिलं नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं.[१२] आपल्या मंदिर प्रवेशाबाबतच्या भूमिकेबाबत आंबेडकरांनी गांधींना सांगितले होते की, "शोषित वर्ग फक्त मंदिर प्रवेशामुळे समाधानी होणार नाही. या वर्गाचा नैतिक आणि सामाजिक उत्कर्ष होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जातीव्यवस्थेचे निर्दालन होणे आवश्यक आहे. जातीव्यवस्थेेेचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय अस्पृश्यांचा उत्कर्ष होणार नाही."[][]

सामाजिक बदलाची प्रक्रिया हळुहळू होत असते, याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही होती. शोषितांना मानवतेचे पूर्ण हक्क मिळावे यासाठी ते वेगवेगळ्या मार्गांनी लढत राहिले आणि मंदिर प्रवेशही त्याच लढ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, असे मत 'साप्ताहिक विवेक'चे सह-कार्यकारी संपादक रवी गोळे यांनी मांडले.[ संदर्भ हवा ] आंबेडकरांच्या या लढ्याने काय साध्य केले याबद्दल अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड सांगतात की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा प्रतीकात्मक होता. जो समाज जातीयवादाचा, बळी पडला आहे, त्याला या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी आणि सत्ताधारी इंग्रजांना जाग यावी यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते."[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Kshīrasāgara, Rāmacandra (1994). Dalit Movement in India and Its Leaders, 1857-1956 (इंग्रजी भाषेत). M.D. Publications Pvt. Ltd. ISBN 9788185880433.
  2. ^ Jadhav, K. N. (2015). Dr. Ambedkar: Life and Mission (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 9788171543298.
  3. ^ a b c d e कुलकर्णी, तुषार (14 एप्रि, 2019). "आंबेडकर को जब रामनवमी के रथ में हाथ नहीं लगाने दिया गया" – www.bbc.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ a b c d गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. १६२-१६५. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ डॉ. आंबेडकर यांची भाषणं आणि पत्रं (प्रकाशक- परराष्ट्र मंत्रालय भारत सरकार, भाग 17).
  6. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. १६३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. १६३-१६४. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ a b "काळाराम सत्याग्रह आणि डॉ. आंबेडकर". Maharashtra Times.
  9. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. १६४. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  10. ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत पाहायला मिळणार काळाराम मंदिर सत्याग्रह". Lokmat. 7 फेब्रु, 2020. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  11. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/artical-on-vashivarcha-paulkhuna/articleshow/57349100.cms. 2020-04-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ डॉ. आंबेडकरांची भाषणे आणि पत्रे, प्रकाशक भारतीय परराष्ट्र खाते)

बाह्य दुवे

[संपादन]
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
काळाराम मंदिर सत्याग्रह
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?