For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for अहिल्याबाई होळकर.

अहिल्याबाई होळकर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
चित्र:Maharani Ahilya Bai Holkar.png
महाराणी पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर
पदव्या पुण्यश्लोक ,राजमाता, धर्म रक्षक
जन्म ३१ मे, १७२५
चौंडी,( मल्हारपीठ ) अहमदनगर जिल्हा
मृत्यू १३ ऑगस्ट, १७९५ (वय ७०)
इंदौर, सध्याचे मध्यप्रदेश
पूर्वाधिकारी मल्हारराव होळकर
उत्तराधिकारी तुकोजीराव होळकर
वडील माणकोजी शिंदे
आई सुशिलाबाई शिंदे
पती खंडेराव होळकर
संतती मालेराव होळकर, मुक्ताबाई
राजघराणे होळकर घराणे
धर्म हिंदू
मंदिर काशी विश्वेश्वर आदी मंदिर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (३१ मे, १७२५ - १३ ऑगस्ट, १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) या भारतातील, माळव्याच्या 'तत्त्वज्ञानी माहाराणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते.[ संदर्भ हवा ]

होळकर यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी (मल्हारपीठ) खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. मल्हारराव होळकर पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.

मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई धनगर साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.[ संदर्भ हवा ]

इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट" असे म्हणले आहे.[] थोडक्यात अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रित केली आहे. त्याने म्हणले आहे की ज्या वेळेस जगातील सर्वात महान स्त्रीयांचा इतिहास लिहिला जाईल त्या वेळेस पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्व प्रथम लिहिले जाईल.

अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखल प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिकपरळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्याबाईंना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती.[ संदर्भ हवा ]

शासक

[संपादन]

इ.स. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते.

"चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करू शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा.....कूच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा."

पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्यादेवींनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्यादेवी सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात.

पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्यादेवींनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदूमंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली. माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.

भारतीय संस्कृती कोशात अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे - काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.

अहिल्यादेवींनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्यादेवींच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्यादेवींनी दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी त्यांच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.

अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ, इंदूर येथील विश्वविद्यालयास त्यांचे नाव दिले आहे. तसेच त्यांचे नावाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे एक विद्यापीठ सोलापूरला आहे.

भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरीही, त्यांनी  त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला. यासाठी रायगंण सुभ्यावर नवापुर या ठिकाणी ठिंगळे भिल्ल सरदार यांना नेमले त्यामुळे भिल्ल जमाती होळकराच्या सैन्यात आले व त्यांनी सुरते वर वचक बसवला. याही बाबतीत, (आंग्ल लेखक) 'माल्कम' यांच्यानुसार, अहिल्यादेवींनी' त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले'.

महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागरांना, मूर्तिकारांना व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली.

एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही. राजकारणातील बारकावे व तत्त्व व्यावहारिक नीती नियम व सूत्रे आपल्या देशाची राजकीय, सामाजिक, भौगोलिक स्थिती, रणांगणावरील आखाडे व अडचणी आणि बारकावे समजून घेतले. मल्हारराव यांच्या गैरहजेरीत सर्व कारभार करण्यात त्या पारंगत झाल्या.

ज्या काळी दळणवळणाची साधने फारच कमी होती किवा म्ह्टले तर नव्हती अशी परस्थिती होती अश्या खडतर काळात त्यांनी भारतातील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व राज्यात मंदिरे धर्मशाळा तलाव, विहिरी, पाणपोई, घाट अशी अनेक समाज उपयोगी कामे केली. आज ही वास्तुशिल्पे व त्यांनी उभारलेली स्थापत्य कला मातोश्रीच्या भव्य कार्याची साक्ष देत उभी आहेत. वास्तुशिल्प व बांधकाम केल्यामुळे कारागिरांची कला जोपासून संकृतीचा वारसा तर जपलाच पण त्याच बरोबर गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळवून दिले. त्यांच्या कामगिरीचा हा दुहेरी बाणा निश्चीतच अभिमानास्पद आहे

सेन्या तुकडी

ज्या प्रमाणे आहिल्यादेवी लोककल्यान आणि समाज सुधारना करीत त्याच प्रमाने लोकांमधे समानता अनन्याच काम करीत आहिल्यादेवी नी आपल्या सेन्या मध्ये पुरुषा ना संधी देत त्याच प्रमाने महिला नाही संधी मिळत आणि म्हणुनच आहिल्यादेवी नी सेन्या मध्ये महिला ची ही एक मोठी तुकडी खास सामावुन घेतली आणि म्हणुनच आहिल्यादेवी ना समान न्याय करनार्या न्यायदेवता म्हनुन आहिल्यादेवी ना ओळखल जातं

शेती व शेतकरी उद्धाराची कार्य;

शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या जाचक करातून मुक्त केले. अनेक ठिकाणी तलाव व विहिरी बांधल्या. शेतकऱ्यांना गोपालनाचे महत्त्व पटवून प्रजेला गाई देऊन मोठ्या प्रमाणात गोपालन घडवून आणले.

गुणग्राहता;

मातोश्रीची लोककल्याणाची कीर्ती ख्याती ऐकुन अनेक विद्वन लोक त्यांची भेट घेण्यास येत असत आणि नंतर त्या ठिकाणीच राहत असत. अनेक विषयाचे विद्वान, शास्त्री पंडीत, व्याकरणकार, कीर्तनकार, ज्योतिषी, पुजारी, वैद्य, हकीम यानाही त्या मुद्दाम बोलावून घेऊन त्यांना त्या राजाश्रय देत असत. महेश्वर नगरीत वास्तव करीत होते म्हणूनच महेश्वर नगरी त्याकाळी संस्कृती विद्वान व धर्माचे माहेरघर म्हणून नावारूपाला आली होती . ग्रंथ संपंदा- निर्मिती छापखाने नसल्याने त्या काळी धर्माचे तत्त्वज्ञान जाणून घेण्याकरिता हस्तलिखिते यावरच अवलंबून राहावे लागत होते. हस्तलिखिते लिहिणारे मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी करत असत. ज्या प्रमाणे हिरा व रत्ने पारखणाऱ्या जवाहिऱ्याप्रमाणे त्या विद्द्येची महत्त्व जाणत असल्याने त्याच्या मागणीप्रमाणे रक्कम देऊन ग्रंथाची हस्तलिखिते तयार करून विद्वान विद्यार्थ्यांसाठी अनमोल ग्रंथसंपदा निर्माण करून जतन केली. शाळा काढून विद्याप्रसाराचे काम केले.

अंधश्रद्धा निवारण;

या काळात सती जाण्याची मोठी रूढी व परंपरा होती. सती गेल्याने पुण्य व न गेल्याने पाप असा समज समाजात रूढ होता. रामायण आणि महाभारत यामध्ये अनेक युद्ध होऊनही कोणी सती गेल्याचा उल्लेख नाहीत असे अनेक दाखले देऊन सती प्रथेला शास्त्राचा आधार नाही हे प्रजेला पटवून दिले. कालांतराने १८२९ साली राजाराम मोहन रॉय यांचा प्रयत्नामुळे सतीची अनिष्ट चाल कायद्याने बंद करण्यात आली यावरून अहिल्याबाई होळकर यांच्या दूरदृष्टतेची प्रचीती आपणास यते.

चोर व दरोडेखोर यांचे मत परिवर्तन;

त्या काळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व प्रजेची चोर दरोडेखोर व भिल्ल लुटमार करीत असत अशा लुटारू लोकांना ठिंगळे सरदारांमार्फत सैन्यात सामील करून पाळीव पशु व गायी, म्हशी आणि शेत जमीनी दिल्या व त्यांचे मत परिवर्तन केले व ते लोक शेती करू लागले त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला. भिल्ल लोकांना भिलकवाडी कर घेण्याची परवानगी दिली. एवढे करूनही प्रजेला त्रस्त करणाऱ्या या लोकांना त्यांनी तोफेच्या तोंडी देऊन एक प्रकारचा दरारा नर्माण केला.

न्यायप्रियता;

अहिल्याबाई होळकर यांच्या न्यायप्रियतेची ख्याती सर्व दूर पसरली होती. सर्वांना समान न्याय हा त्यांचा बाणा होता. त्यांच्या संस्थानचा सुभेदार तुकोजी होळकर यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला म्हणून त्याला तुरुंगात डांबले. तर [अहिल्यादेवी च्या सर्वांना समान न्याय या विचाराने डाॅ .बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा प्रभावित होते ]

शोकात्म अखेर – मृत्यू;

महेश्वर येथे संस्कृत पाठशाळा सुरू केली. अन्नछत्रे घातली. अनेक ठिकाणी मंदिरे बांधली. गुजराथेतील सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जिर्णोद्धार केला. असे पुण्यसंचयाचे काम अहिल्यादेवी करीत होत्या. तशातच त्यांचा नातू तेराव्या वर्षी मरण पावला. काही दिवसातच जावई लढाईत कामी आला आणि मुलगीही सती गेली. आयुष्यभर कोसळलेल्या संकटांनी त्यांचा अंत पाहिला होता. त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर १३ ऑगस्ट १७९५ रोजी त्यांनी शांतपणे मृत्यूला जवळ केले.[ संदर्भ हवा ]

अहिल्यादेवी यांच्याबद्दलची मते

[संपादन]
अहिल्यादेवी होळकर यांचा किल्ला

"अहिल्यादेवी एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला."[]

"ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जसे पुरुषांमधले उत्तम राजे होते, तसेच अहिल्यादेवी ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती. तिच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. अशी अहिल्यादेवी ही एक महान स्त्री होती."[ संदर्भ हवा ]

"आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्यादेवींनी रयतेचे मन जिंकले. नाना फडणवीसांसकट अनेक उच्च धुरीण आणि माळव्यातील लोकांनुसार ती एक दिव्य अवतार होती. ती आजतागायतची सर्वांत शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती.[] अलीकडच्या काळातील चरित्रकार अहिल्यादेवींना 'तत्त्वज्ञानी राणी' असे संबोधतात. याचा संदर्भ बहुतेक 'तत्त्वज्ञानी राजा' भोज याच्याशी असावा.[]

अहिल्यादेवी होळकर ह्या एक खरोखरीच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. सन १७७२ मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांबरोबर हातमिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती. त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे त्यांनी नोंदले आहे :" वाघासारखे इतर प्राणी हे शक्ती वा युक्तीने मारले जाऊ शकतात, परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असते. सरळ त्याच्या चेहऱ्यावर वार केल्यासच ते मरते. एकदा त्याच्या मजबूत पकडीत सापडल्यावर ते त्याच्या शिकारीस, गुदगुल्या करून ठार मारते. असाच इंग्रजांचा मार्ग आहे. हे बघता, त्यांच्यावर मात करणे कठीण आहे.[]

"या इंदूरमधील शासकांनी, त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्वांस चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले. व्यापाऱ्यांनी चांगल्या कपड्यांचे उत्पादन केले, व्यापार वाढला, शेतकरी हे शांततेत व दबावरहित होते. कोणतेही प्रकरण राणीच्या निदर्शनास आले की ते कडकपणे हाताळले जाई. अहिल्यादेवीना आपल्या प्रजेचा उत्कर्ष आवडत असे. तसेच ती प्रजा राजा हिसकावून घेईल म्हणून आपली संपत्ती उघड करण्यास घाबरत नाही, हे बघणे आवडत असे. दूरदूरपर्यंत, रस्त्यांच्या कडेला, दाट छायादार वृक्ष लावण्यात आले होते, विहिरी केल्या होत्या, पथिकांसाठी विश्रांतीगृहे. गरीब, घर नसलेले व अनाथ या सर्वांना त्यांच्या जरुरीनुसार, सर्व मिळत होते. बहुत काळापासून, भिल्ल लोक पहाडांतून सामानाची नेआण करत असतांना लूटमार करीत असत. अहिल्याबाईंनी भिल्ल लोकांना त्यापासून मुक्ती मिळवून दिली व प्रामाणिकपणे शेती करण्याची संधी त्यांना देऊ केली. सर्व समाजाला अहिल्यादेवी आवडत असत आणि तो त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करी. त्यांच्या कन्येने तिचा पती, यशवंतराव फानसे यांच्या मृत्यूनंतर सती जाणे हे अहिल्यादेवींच्या आयुष्यातले शेवटचे सर्वात मोठे दुःख होते.[]

वयाच्या ७०व्या वर्षी अहिल्यादेवी होळकरांची प्राणज्योत मावळली.

भारत स्वतंत्र झाल्यावरही पुढील अनेक वर्षे शेजारील भोपाळ, जबलपूर किंवा ग्वाल्हेर या शहरांपेक्षा इंदूर सर्व बाबतीत प्रगतिशील राहिले. याच्या मागे अहिल्यादेवीची दूरदृष्टी होती.

अहिल्याबाई होळकर यांनी गंगेवर बांधलेला घाट

सन्मान

[संपादन]
अहिल्याबाई होळकर यांच्यावरील पोस्टाचे तिकीट (१९९६)

अहिल्यादेवींच्या सन्मानाप्रीत्यर्थ व स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने २५ ऑगस्ट १९९६ रोजी एक टपाल तिकिट जारी केले.[]

या अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव "देवी अहिल्याबाई विमानतळ" असे ठेवण्यात आले आहे, आणि इंदूर विद्यापीठास "देवी अहिल्या विश्वविद्यालय" असे नाव देण्यात आले आहे".[]

महाराष्ट्रातील सोलापूर विद्यापीठाचे नवीन नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ' ठेवण्यात आले आहे.

अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ १३ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर असे केले.[]

होळकर यांची देशभरातील कामे

[संपादन]
औरंगाबाद मधील अहिल्याबाईंचा पुतळा

अहिल्यादेवींच्या काळातील किल्ले व भुईकोट:

  1. किल्ले महेश्वर
  2. इंदोरचा राजवाडा
  3. चांदवडचा रंगमहाल
  4. वाफगाव - यशवंतराजे होळकर यांचे जन्मस्थळ
  5. खडकी-पिंपळगाव : होळकर वाडा
  6. काठापूर : होळकर वाडा किंवा वाघ वाडा
  7. पंढरपूर : होळकर वाडा
  8. लासलगाव : अहिल्यादेवींचा किल्ला
  9. पळशी : पळशीकर वाडा(होळकरांचे दिवाण)
  10. रायकोट किल्ला कोंडाईबारी घाट

अहिल्यादेवींच्या काळातील मंदिरे बारव व धर्मशाळा :

  • अकोले तालुका- विविध ठिकाणी विहिरी उदा. वाशेरे, वीरगाव, औरंगपूर.
  • वीरगाव - बारव
  • अंबा गाव – दिवे.
  • अमरकंटक (मप्र)- श्री विघ्नेश्वर, कोटितीर्थ, गोमुखी, धर्मशाळा व वंश कुंड
  • अलमपूर (मप्र) – हरीहरेश्वर, बटुक, मल्हारीमार्तंड, सूर्य, रेणुका,राम, हनुमानाची मंदिरे, लक्ष्मीनारायणाचे,मारुतीचे व नरसिंहाचे मंदिर, खंडेराव मार्तंड मंदिर व मल्हाररावांचे स्मारक
  • आनंद कानन – श्री विघ्नेश्वर मंदिर.
  • अयोध्या (उ.प्र.)– श्रीरामाचे मंदिर, श्री त्रेता राम, श्री भैरव, नागेश्वर/सिद्धार्थ मंदिरे, शरयू घाट, विहिरी, स्वर्गद्वारी मोहताजखाना, अनेक धर्मशाळा.
  • आमलेश्वर, त्र्यंबकेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार
  • उज्जैन (म.प्र.)– चिंतामणी गणपती,जनार्दन,श्री लीला पुरुषोत्तम,बालाजी तिलकेश्वर,रामजानकी रस मंडळ, गोपाल, चिटणीस, बालाजी, अंकपाल, शिव व इतर अनेक मंदिरे,१३ घाट, विहिरी व अनेक धर्मशाळा इत्यादी.
  • ओझर (अहमदनगर) (महाराष्ट्र) – २ विहिरी व एक कुंड.
  • इंदूर – अनेक मंदिरे व घाट
  • ओंकारेश्वर (मप्र) – मामलेश्वर महादेव,
  • कर्मनाशिनी नदी – पूल
  • काशी (बनारस) – काशी विश्वनाथ,श्री तारकेश्वर, श्री गंगाजी, अहिल्या द्वारकेश्वर, गौतमेश्वर व अनेक महादेव मंदिरे, मंदिरांचे घाट, मनकर्णिका, दशास्वमेघ, जनाना, अहिल्या घाट, उत्तरकाशी, रामेश्वर पंचक्रोशी, कपिलधारा धर्मशाळा, शीतल घाट.
  • केदारनाथ – धर्मशाळा व कुंड
  • कोल्हापूर (महाराष्ट्र) – मंदिर-पूजेसाठी साहाय्य.
  • कुम्हेर – विहीर व राजपुत्र खंडेरावांचे स्मारक.
  • कुरुक्षेत्र (हरयाणा) - शिव शंतनु महादेव मंदिरे,पंचकुंड व लक्ष्मीकुंड घाट.
  • गंगोत्री –विश्वनाथ, केदारनाथ, अन्नपूर्णा, भैरव मंदिरे, अनेक धर्मशाळा.
  • गया (बिहार) – विष्णूपद मंदिर.
  • गोकर्ण – रावळेश्वर महादेव मंदिर, होळकर वाडा, बगीचा व गरीबखाना.
  • घृष्णेश्वर (वेरूळ) (महाराष्ट्र) – शिवालय तीर्थ.
  • चांदवड वाफेगाव (महाराष्ट्र) – विष्णूचे व रेणुकेचे मंदिर.
  • चिखलदा – अन्नछत्र
  • चित्रकूट (उ.प्र.) - श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
  • चौंडी – चौडेश्वरीदेवी मंदिर, सिनेश्वर महादेव मंदिर, अहिल्येश्वर मंदिर, धर्मशाळा व घाट
  • जगन्नाथपुरी (ओरिसा) – श्रीरामचंद्र मंदिर, धर्मशाळा व बगीचा
  • जळगांव (महाराष्ट्र) - राम मंदिर
  • जांबगाव – रामदासस्वामी मठासाठी दान
  • जामघाट – भूमिद्वार
  • जेजुरी(महाराष्ट्र) – मल्हारगौतमेश्वर, विठ्ठल, मार्तंड मंदिरे, जनाई महादेव व मल्हार या नावाचे तलाव.
  • टेहरी (बुंदेलखंड) – धर्मशाळा.
  • तराना? – तिलभांडेश्वर शिव मंदिर, खेडपती, श्रीराम मंदिर, महाकाली मंदिर.
  • त्र्यंबकेश्वर (नाशिक) (महाराष्ट्र)– कुशावर्त घाटावर पूल.
  • द्वारका (गुजरात) – मोहताजखाना, पूजागृह व पुजाऱ्यांना काही गावे दान.
  • श्री नागनाथ (दारुकावन) – १७८४मध्ये पूजा सुरू केली.
  • नाथद्वार – अहिल्या कुंड, मंदिर, विहीर.
  • निमगाव (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
  • नीलकंठ महादेव – शिवालय व गोमुख.
  • नैमिषारण्य (उ.प्र.) – महादेव मंडी, निमसर धर्मशाळा, गो-घाट, चक्रीतीर्थ कुंड.
  • नैम्बार (मप्र) – मंदिर
  • पंचवटी (नाशिक)(महाराष्ट्र)– श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा, रामघाट.
  • पंढरपूर (महाराष्ट्र) – श्री राम मंदिर, तुळशीबाग, होळकर वाडा, सभा मंडप, धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली. बाजीराव विहीर
  • पिटकेश्वर, ता. इंदापूर - पंढरपूर वारीच्या जुन्या मार्गावर बांधलेली बारव [१०]
  • पिंपलास (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
  • पुणतांबे (महाराष्ट्र) – गोदावरी नदीवर घाट.
  • पुणे (महाराष्ट्र) – घाट (कोणता घाट?)
  • पुष्कर – गणपती मंदिर,मंदिरे,धर्मशाळा व बगीचा.
  • प्रयाग (अलाहाबाद,उ.प्र.) - विष्णू मंदिर, घाट व धर्मशाळा, बगीचा, राजवाडा.
  • बद्रीनारायण (उ.प्र.) –श्री केदारेश्वर मंदिर, हरिमंदिर, अनेक धर्मशाळा (रंगदचाटी, बिदरचाटी, व्यासंग, तंगनाथ, पावली) मनु कुंड (गौरकुंड व कुंडछत्री), देवप्रयाग येथील बगीचा व गरम पाण्याचे कुंड, गायींच्या चरण्यासाठी कुरणे.
  • बऱ्हाणपूर (मप्र) – घाट व कुंड.
  • बिठ्ठूर – ब्रह्मघाट
  • बीड (महाराष्ट्र)– घाटाचा जीर्णोद्धार.
  • बेल्लूर (कर्नाटक) – गणपती, पांडुरंग, जलेश्वर, खंडोबा, तीर्थराज व अग्नि मंदिरे, कुंड
  • ' भरतपूर' – मंदिर, धर्म शाळा व कुंड.
  • भानपुरा – नऊ मंदिरे व धर्मशाळा.
  • भीमाशंकर (महाराष्ट्र) – गरीबखाना
  • भुसावळ (महाराष्ट्र) - चांगदेव मंदिर
  • मंडलेश्वर – शिवमंदिर घाट
  • मनसा – सात मंदिरे.
  • महेश्वर - शंभरावर मंदिरे, घाट, धर्मशाळा व घरे.
  • मामलेश्वर महादेव – दिवे.
  • मिरी (अहमदनगर) (महाराष्ट्र) – सन १७८० मध्ये भैरव मंदिर
  • रामपुरा – चार मंदिरे, धर्मशाळा व घरे.
  • रामेश्वर (तामिळनाडु) – हनुमान व श्री राधाकृष्ण यांची मंदिरे, धर्मशाळा, विहीर, बगीचा इत्यादी.
  • रावेर (महाराष्ट्र)– केशव कुंड
  • वाफगाव(महाराष्ट्र) – होळकर वाडा व विहीर.
  • श्री विघ्नेश्वर – दिवे
  • वृंदावन (मथुरा) – चैनबिहारी मंदिर, कालियादेह घाट, चिरघाट व इतर अनेक घाट, धर्मशाळा व अन्नछत्र.
  • वेरूळ (महाराष्ट्र) – लाल दगडांचे मंदिर.
  • श्री वैजनाथ (परळी,) (महाराष्ट्र)– सन १७८४ मध्ये वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार.
  • श्री शंभु महादेव पर्वत, शिंगणापूर (महाराष्ट्र) – विहीर.
  • श्रीशैल मल्लिकार्जुन (कुर्नुल, आंध्रप्रदेश) – शिवाचे मंदिर
  • संगमनेर (महाराष्ट्र)– राम मंदिर.
  • सप्‍तशृंगी – धर्मशाळा.
  • संभल? (संबळ) – लक्ष्मीनारायण मंदिर व २ विहिरी.
  • सरढाणा मीरत – चंडी देवीचे मंदिर.
  • साखरगाव (महाराष्ट्र)– विहीर.
  • सिंहपूर – शिव मंदिर व घाट
  • सुलतानपूर (खानदेश) (महाराष्ट्र)– मंदिर
  • सुलपेश्वर – महादेव मंदिर व अन्नछत्र
  • सोमनाथ मंदिर, धर्मशाळा, विहिरी.
  • सौराष्ट्र (गुजरात) – सन १७८५ मध्ये सोमनाथ मंदिर, जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा.
  • हरिद्वार (उ.प्र.) – कुशावर्त घाट व मोठी धर्मशाळा.
  • हांडिया – सिद्धनाथ मंदिरे, घाट व धर्मशाळा
  • हृषीकेश – अनेक मंदिरे, श्रीनाथजी व गोवर्धन राम मंदिर
  • नंदुरबार (महाराष्ट्र)- विहीर
  • मुक्ताईनगर(महाराष्ट्र)-मुक्ताबाई समाधीस्थळ कोथळी
  • समनापूर ता.संगमनेर(महाराष्ट्र)-पूरातन बारव(विहीर)

अहिल्याबाई होळकर यांच्यावरील प्रकाशित पुस्तके

[संपादन]
  • 'अहिल्याबाई' : लेखक - श्री. हिरालाल शर्मा
  • 'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. पुरुषोत्तम
  • 'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. मुकुंद वामन बर्वे
  • अहिल्याबाई होळकर - वैचारिक राणी (लेखक : म.ब. कामत व व्ही.बी. खेर)
  • अहिल्याबाई होळकर : लेखक - म.श्री. दीक्षित
  • अहिल्याबाई होळकर (चरित्र), लेखक : खडपेकर
  • कर्मयोगिनी : लेखिका - विजया जहागीरदार
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (जनार्दन ओक)
  • महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार - तेजस्विनी अहिल्‍याबाई होळकर (लेखिका : विजया जहागीरदार; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)
  • शिवयोगिनी (कादंबरी, लेखिका - नीलांबरी गानू)
  • 'ज्ञात- अज्ञात अहिल्याबाई होळकर' लेखक - विनया खडपेकर

अहिल्यादेवींचे नाव असलेल्या संस्था -

[संपादन]
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ,सोलापूर
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल काॅलेज,बारामती जि.पुणे
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हाळगाव, ता.जामखेड, जि.अहमदनगर
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान(गंगापुर,तोगे नाना )
  • अहिल्याबाई होळकर चौक (स्टेशन रोड-उस्मानपुरा छत्रपती संभाजी नगर
  • अहिल्यादेवी होळकर पूल (नाशिक)
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
  • देवी अहिल्या विश्वविद्यालय (इंदूर)
  • अहिल्यादेवी हायस्कूल (पुणे)
  • देवी अहिल्या इंटरनॅशनल एअरपोर्ट (इंदूर)
  • देवी अहिल्या होळकर शिल्प सृष्टी ,चौंडी अहेमदनगर
  • अहिल्यादेवी होळकर चौक दौंड पुणे
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यामंदिर जेजुरी
  • महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली
  • राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वाचनालय कल्लप्पवाडी,अक्कलकोट सोलापूर
  • अहिल्याबाई होळकर चौक जोगेश्वरी संभाजीनगर.
  • अहिल्याबाई होळकर चौक हाटकरवाडी

चित्रपट

[संपादन]
  • "देवी अहिल्याबाई" या नावाचा एक चित्रपट सन २००२ मध्ये आला होता. त्यात शबाना आझमी हिने हरकूबाईची-(खांडा? राणी, मल्हारराव होळकरांची एक पत्‍नी) भूमिका केली होती. चित्रपटात सदाशिव अमरापूरकर यांची मल्हारराव होळकर (अहिल्याबाईचे सासरे) म्हणून भूमिका होती. "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर" या नावाचा एक चित्रपट आहे.[२]
  • अहिल्याबाईच्या जीवनावर, इंदूरच्या Educational Multimedia Research Centerने एक २० मिनिटांचा माहितीपट बनवला होता.
  • पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिका सध्या Sony TV वर सुरू आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "प्रजाहितदक्ष राजमाता अहिल्यादेवी होळकर". mymahanagar.com. ९ जून २०१९ रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ जवाहरलाल नेहरू : डिस्कव्हरी ऑफ इंडिया, २००४, पान -३०४
  3. ^ माल्कम जे . अ मेमॉयर ऑफ सेन्ट्रल इंडिया, तसेच म.ब. कामत व व्ही.बी. खेर यांच्या "अहिल्याबाई होळकर : वैचारिक राणी , पान ८५, आणि जॉन केय यांच्या इंडिया: अ हिस्टोरी, पान ४०७
  4. ^ जॉन किय, इंडिया: अ हिस्टोरी , पान ४०७ , गोर्डन एस , दि मराठाज पान १६२
  5. ^ जॉन किय, इंडिया: अ हिस्टोरी , पान ४२५, सरदेसाई जी.एस., रियासत , मुंबई १९२५, एम.बी. कामत , व्ही.बी. खेर : अहिल्याबाई होळकर : एक वैचारिक राणी पान १२६
  6. ^ डॉ. अनी बेजंट, अहिल्यादेवी - अ ग्रेट रूलर, चिल्ड्रेन ऑफ मदरलॅन्ड , पान २९० - २९१ .
  7. ^ [१]
  8. ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तुत्वान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. ३७. ISBN 978-81-7425-310-1.
  9. ^ Banerjee, Shoumojit (2024-03-13). "Maharashtra's Ahmednagar to be officially called 'Ahilyanagar'" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
  10. ^ शेळके, प्रा. नीलेश केदारी (जून २०१८). "अहिल्याबाई होळकरांचे पिटकेश्वर येथील दोन नवीन शिलालेख". संशोधक. : १४.

बाह्य दुवे

[संपादन]


{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
अहिल्याबाई होळकर
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?